एअरलाइन्सने श्रीनगरहून विमान प्रवासाचे भाडे वाढवले, तिकीट दरात तिप्पट वाढ!   

प्रवाशांचा संताप 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर एअरलाइन्सने त्यांच्या तिकीटाच्या भाड्यात तब्बल तिप्पट वाढ झाली आहे. एअरलाइन्सच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावरुन युजर्स तक्रार करत असून याबाबत संताप व्यक्त केला आहे. सरकारने कंपन्यांना आता भाडे वाढ करू नये, असे सांगितले आहे. सरकारी हस्तक्षेपानंतर विमान कंपन्यांनी श्रीनगरहून अतिरिक्त उड्डाणे सुरू केली आहेत.
 
पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घाबरलेले काश्मीरमधील बरेच पर्यटक आपल्या घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात काश्मीरमधून मुंबई, दिल्लीकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अचानक वाढली. याचाच फायदा घेत एअरलाइन्स कंपन्यांकडून तिकीट दरात तिप्पट वाढ केली. मनीष आरजे नावाच्या एका वापरकर्त्यांनी एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने श्रीनगर ते कोलकातापर्यंतचं भाडे दाखवले आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, अशा संकटाच्या काळात खासगी विमान कंपन्या प्रवाशांकडून तिप्पट भाडे आकारत आहेत.

तिकीटाच्या दरवाढीबाबत सरकारचे आदेश 

या कठीण काळात एअरलाइन्सने तिकीटाचे दर वाढवल्याचे समोर आल्यानंतर केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी एअरलाइन्सला इशारा देत तिकीट दरात दरवाढ न करण्याचे सांगितले आहे. सर्व विमान कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेतली आणि त्यांना भाडे वाढवू नये, अशा इशारा दिला आहे. या कठीण काळात कोणत्याही प्रवाशावर भार पडू नये म्हणून विमान कंपन्यांना तिकीट दर सामान्य ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विमानांच्या संख्येत वाढ 

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाइन्सने श्रीनगरहून चार अतिरिक्त उड्डाणं चालवली आहेत. दोन विमाने दिल्लीसाठी आणि दोन मुंबईसाठी आहेत.ही विमान सेवा बुधवारी अशा पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्यांना त्यांच्या काश्मीरमधील सुट्ट्या कमी करून घरी परतायचे आहेत. त्याशिवाय अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी, गरज पडल्यास अतिरिक्त विमाने सज्ज ठेवल्याची माहिती हवाई मंत्रालयाने दिली आहे.

कर माफ केले 

श्रीनगरला जाणाऱ्या विमानांसाठी कॅन्सलेशन आणि रीबुकिंग शुल्कही एअरलाइनने माफ केले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर बरेच लोक आता काश्मीरला पर्यटनासाठी जाण्याच्या त्यांच्या योजनांवर पुनर्विचार करत आहेत. त्यामुळे एअरलाइन्सकडून हा निर्णय घेतला आहे. या भागातील ३० एप्रिल २०२५ पर्यंत कन्फर्म बुकिंग केलेल्या प्रवाशांना मोफत रीशेड्युलिंग आणि तिकीट कॅन्सल केल्यावर पूर्ण रिफंड देण्यात येत आहे. ही सुविधा काही अटींसह उपलब्ध असेल.
 

Related Articles